तामगाव-उजळाईवाडी रस्ता अंशतः खुला: शालेय विद्यार्थी आणि अत्यावश्यक सेवांना परवानगी तर अवजड वाहनांना मनाई!

गोकुळ शिरगाव: तामगाव ते उजळाईवाडी हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असलेला प्रमुख मार्ग काल, शुक्रवारी वाहतुकीसाठी अंशतः खुला करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी, करवीर यांनी ६ मे २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र, तामगाव आणि उजळाईवाडी येथील स्थानिक नागरिकांनी शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी परवानगीची मागणी केली होती.
या मागणीनंतर, दीड महिन्याच्या पाठपुराव्यानंतर उपविभागीय अधिकारी करवीर यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. यामुळे वाहनधारकांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
आता केवळ दुचाकी, तीनचाकी आणि स्कूल बसना विशिष्ट वेळेत या रस्त्यावरून वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत, सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत दुचाकी, शालेय विद्यार्थ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या छोट्या तीनचाकी, स्कूल बस आणि ॲम्ब्युलन्सला नियंत्रित वाहतुकीची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शालेय विद्यार्थी आणि अत्यावश्यक सेवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी हा रस्ता बंदच राहणार आहे. जड वाहनांची वाहतूक होणार नाही याची जबाबदारी तामगाव आणि उजळाईवाडी ग्रामपंचायतींनी घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत. पर्यायी मार्ग तयार होईपर्यंत रस्ता खुला करण्यासाठी महेश पिंपळे, माणिक जोंधळेकर, चंद्रशेखर मस्के, विश्वास तरटे, दीपक पावंडे, अमर गायकवाड, दादासो मगदूम, डॉ. विक्रम कुळवमोडे, ॲड. भाईजान अन्सारी, विकी मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतले.
दिशानिर्देश आणि फलक लावण्याची सूचना:
विमानतळावर विमान टेक-ऑफ आणि लँडिंग दरम्यान वाहतूक होणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश ग्रामपंचायत आणि विमानतळ प्राधिकरणांना देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विमानपतन निर्देशक, कोल्हापूर हवाई अड्ड्याला आवश्यक ते दिशानिर्देश आणि फलक लावण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.