Uncategorized

धुंदवडे खोऱ्यात बीएसएनएल रेंज पुन्हा गायब झाल्याने ग्राहक संतप्त!

धुंदवडे (विलास पाटील) : सध्याच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच मोबाईल फोन ही मानवाची एक अत्यंत आवश्यक गरज बनली आहे. प्रत्येक मिनिटाला हातात मोबाईल असणे ही सवय झाली आहे, परंतु त्याला रेंजच नसेल तर त्या मोबाईलचा काय उपयोग, असा संतप्त सवाल धुंदवडे खोऱ्यातील बीएसएनएल ग्राहक विचारत आहेत. गेल्या १५ ते २० दिवसांपासून धुंदवडे खोऱ्यात बीएसएनएलची रेंज पूर्णपणे गायब झाली असून, त्यामुळे ग्राहकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
आजच्या भ्रमणध्वनी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा असली तरी, ग्रामीण भागातील अनेक ग्राहक बीएसएनएल कंपनीवर विश्वास ठेवून त्यांची सेवा वापरत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलच्या सेवेतील समस्या वाढतच चालल्या आहेत. रेंज नसल्यामुळे मोबाईलवरील व्यवहार ठप्प झाले आहेत, महत्त्वाचे कॉल्स करता येत नाहीत आणि त्यामुळे दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे काही ग्राहकांनी तर बीएसएनएलचे सिम कार्ड पोर्ट करून दुसऱ्या कंपनीची सेवा घेण्याचा पर्याय निवडला आहे.
चौधरवाडी, धुंदवडे येथील युवा उद्योजक अमर चौधरी यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की, “मोबाईलशिवाय आणि रेंजशिवाय प्रत्येकाचे व्यवहार किंवा कॉल करण्यास अडथळे निर्माण होत आहेत.”
बीएसएनएलने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन धुंदवडे खोऱ्यातील आपली सेवा लवकरात लवकर सुरळीत करावी, अशी मागणी येथील संतप्त ग्राहकांकडून जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button