पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बदनामीप्रकरणी कठोर कारवाईची धनगर समाजाची मागणी!

कोल्हापूर (सलीम शेख ) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील आणि बदनामीकारक टिप्पणी करणाऱ्या सुनील गोपाळ उभे नामक व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी समस्त धनगर समाजाने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सकल धनगर समाज, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार दिवसांपूर्वी सुनील गोपाळ उभे या व्यक्तीने फेसबुकवरील कमेंटद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अत्यंत अश्लील, अपमानकारक आणि विकृत मजकूर लिहिला आहे. या संतापजनक कृत्यामुळे संपूर्ण धनगर समाजात तीव्र दुःख आणि रोष व्यक्त झाला असून, समाजात तणाव निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण समाजाच्या प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्याबद्दल अशा प्रकारची कोणासपद् भाषा वापरणे ही केवळ धनगर समाजाचीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचीही विटंबना आहे. त्यामुळे अशा समाजविघातक मानसिकतेच्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे.
धनगर समाजाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत
सुनील गोपाळ उभे याच्यावर सामाजिक सलोखा बिघडवणे, अश्लील मजकूर प्रसारित करणे आणि समाजाच्या भावना दुखावणे या कारणांवरून तात्काळ गुन्हा दाखल झालेला असून, त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करावेत.
अशा समाजविघातक प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने तत्परता व संवेदनशीलता दाखवावी.
या घटनेत त्वरित कठोर कारवाई न झाल्यास धनगर समाज आक्रमक होईल व तीव्र आंदोलनाची दिशा घेण्यास भाग पडेल, याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. समाजाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करून आम्हाला विश्वासात घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.