दिव्यांग सेना सामाजिक संघटनेकडून परिते येथील अंकुर मतिमंद शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप!

कोल्हापूर (सलीम शेख ) : इंडियन एज्युकेशन सोसायटी संचालित अंकुर मतिमंद मुलांची शाळा व प्रौढ मुलांची कार्यशाळा (निवासी, परिते, भोगावती) येथे दिव्यांग सेना सामाजिक संघटना, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले. दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
यावेळी उत्तम चौगुले यांच्यासोबत संघटनेचे उपाध्यक्ष सुमित शिंदे, राधानगरी तालुका अध्यक्ष किरण चौगुले आणि सदस्य नवनाथ आंबेकर उपस्थित होते. दिव्यांग सेनेच्या वतीने वाशी येथील प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलांनाही वह्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना उत्तम चौगुले यांनी, भविष्यात अशा शाळांना भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, शासन स्तरावरून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय कांबळे, व्यवस्थापकीय अधीक्षक वसुधा कुलकर्णी, शिक्षक रूपाली कोरे, मनोज माने, विनायक कांबळे आणि सोहम कांबळे उपस्थित होते. दिव्यांग सेना सामाजिक संघटनेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.