आझाद हिंद नेचर आर्मी यांची पर्यावरण चळवळ!

कोल्हापूर (सलीम शेख) : आज दिनांक ११ जुलै २०२५ आझाद हिंद नेचर आर्मीच्या महत्त्वाकांक्षी “कोल्हापूरचा पारा ४१@३६ करणार” या पर्यावरण चळवळीला पाच महाराष्ट्र बटालियनची एनसीसी (National Cadet Corps) पूर्ण ताकद देणार आहे. पाच महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित यांनी ही माहिती दिली. या चळवळीअंतर्गत, एनसीसीचे सर्व विद्यार्थी वर्षभरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहतील, असे प्रतिपादन कर्नल दीक्षित यांनी केले.
वृक्षारोपण कार्यक्रमात कर्नल दीक्षित यांचे प्रतिपादन
आझाद हिंद नेचर आर्मी कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर ग्रुप एनसीसी भवन येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात कर्नल दीक्षित बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम होते. कर्नल दीक्षित यांच्या हस्ते, तसेच कर्नल सुहास काळे, कोल्हापूर एनसीसी ग्रुपचे ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आणि आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम यांच्या शुभहस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
तापमान वाढ रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे
कर्नल दीक्षित यांनी पुढे सांगितले की, तापमान वाढ रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक भारतीयाने यात आपला खारीचा वाटा उचलल्यास जगाला पर्यावरणाविषयी एक चांगला संदेश देता येईल.
कोल्हापूर एनसीसी ग्रुपचे ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई यांनी प्लास्टिकचा वापर टाळून प्रदूषण दूर करण्याचे आणि घराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य करण्याचे आवाहन केले.
उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी
यावेळी एनसीसीचे प्रशासन ट्रेनिंग जेसीओ सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले, आझाद हिंद नेचर आर्मीचे अमर भोसले, परितोष उरकुडे, निलेश नाडगोंडा, शिवाजी विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक अभिजीत जाधव, एनसीसीचे सुभेदार सचिन पाटील, सुभेदार राजाराम आढाव, जीसीआय अपूर्वा शेलार, एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, फर्स्ट ऑफिसर अँथनी डिसोजा, फर्स्ट ऑफिसर अनील सकरे, थर्ड ऑफिसर विजय शहापुरे, थर्ड ऑफिसर शंकर महाले, बटालियनचा पीआय स्टाफ यांच्यासह एनसीसी विद्यार्थी आणि कार्यालयीन स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.