बिद्री येथून हजारो वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरकडे रवाना; नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे रेनकोट वाटप!

बिद्री ता. कागल (सलीम शेख ) : बिद्री येथील ग्रामदैवत भावेश्वरी मंदिरातून एक हजारहून अधिक वारकऱ्यांची दिंडी, टाळ-मृदंगाच्या अखंड गजरात आणि ‘विठोबा-रखुमाई’ च्या जयघोषात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. उद्योगपती पांडुरंग शेट्टी यांनी या दिंडीचे आयोजन केले होते.
ग्रामदैवत भावेश्वरी मंदिरासमोरील मुख्य चौकात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वीणापूजन करण्यात आले आणि एस. टी. बसेसची विधिवत पूजा झाल्यानंतर दिंडी पंढरपूरसाठी रवाना झाली. यावेळी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनमार्फत वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या दिंडीमध्ये गळ्यात वीणा आणि हातात टाळ घेऊन अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “विठोबा रखुमाई” च्या गजराने सारा गाव दुमदुमून गेला होता. या सोहळ्याला परिसरातील भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बिद्री कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील, बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, संचालक आर. व्ही. पाटील, संचालक रावसो खिलारी, दिनकरराव कोतेकर, पांडूतात्या पाटील, शिवाजी पाटील, नंदकुमार पाटील, राजाराम चौगुले, उत्तम पाटील, राजेंद्र चौगुले, माजी सरपंच पांडुरंग चौगुले, आनंदा पाटील, एम. डी. पाटील, माजी सभापती जयदीप पवार व दिंडी प्रमुख भालचंद्र चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते. विश्वनाथ डफळे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.