भोगावती नदीच्या पात्राततून एकाची सुखरूप सुटका!

बीडशेट, करवीर (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील बीडशेट गावामध्ये एक हृदयद्रावक घटना घडता-घडता टळली आहे. 70 वर्षीय गणपती बाबू सावंत हे भोगावती नदीपात्रात हात-पाय धुण्यासाठी गेले असता, त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले. सुदैवाने, त्यांनी प्रसंगावधान राखून नदीपात्रातील एका झाडाचा आधार घेतला आणि सुमारे एक तास ते झाडाला पकडून मदतीची वाट पाहत होते.
घटनेची माहिती मिळताच, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान प्रीतम केसरकर आणि कृष्णात सोरटे यांनी कोणतीही वेळ न घालवता बचावकार्य सुरू केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे गणपती बाबू सावंत यांना सुखरूपपणे पाण्याबाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
या बचाव मोहिमेमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी बजावलेली कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि शौर्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनीही आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.