चंदगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाला अखेर हक्काची जागा मिळाली!

चंदगड (सलीम शेख) : गेल्या पंचवीस वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरू असलेल्या चंदगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अखेर स्वतःची जागा मिळाली आहे. ब्लॅक पॅंथर पक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असून, आता विद्यार्थ्यांची कायमस्वरूपी गैरसोय दूर होणार आहे.
चंदगड तालुका हा दुर्गम आणि मागासलेला असल्याने शिक्षणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी या वसतिगृहात प्रवेश घेतात. मात्र, हक्काची इमारत नसल्याने अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन ब्लॅक पॅंथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई आणि चंदगड तालुका अध्यक्ष प्रा. दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय चंदगड आणि जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे सातत्याने आंदोलने आणि पाठपुरावा करण्यात आला.
या अथक प्रयत्नांना यश मिळाले असून, शासकीय पातळीवर गट नंबर ८६३ मधील १२ गुंठे जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह, चंदगड यांच्या नावे सातबारा पत्रकी नोंद करण्यात आली आहे. या जागेवर लवकरच प्रशस्त इमारत बांधली जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उत्तम सोयी उपलब्ध होतील.
या महत्त्वपूर्ण कार्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तत्कालीन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, नूतन प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तत्कालीन तहसीलदार विनोद रणवरे, सध्याचे तहसीलदार राजेश चव्हाण आणि वसतिगृहाचे तत्कालीन अधीक्षक प्रकाश नाईक यांनी मोलाचे सहकार्य केले. ब्लॅक पॅंथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई आणि तालुकाध्यक्ष प्रा. दीपक कांबळे यांनी या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहेत.
वसतिगृहाच्या नावे नोंद असलेला सातबारा उतारा नूतन अधीक्षक सदानंद बगाडे आणि लिपिक सुरेश बुवा यांना सुभाष देसाई, खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक प्रा. आर.पी. पाटील आणि दौलत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या आंदोलनात पक्षाचे निरीक्षक विष्णू कांबळे, उपाध्यक्ष पंडित कांबळे, सचिव सुधाकर कांबळे, वैजनाथ कांबळे, प्रकाश कांबळे, माजी प्राचार्य गुंडू कांबळे, युवराज कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक माळी यांच्यासह रामपूर, कोकरे तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.