तत्काळ कारवाईची मागणी: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे ख्रिश्चन समाजात संताप!

कोल्हापूर (सलीम शेख ) : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरुंविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ख्रिश्चन बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बहुजन पॅंथर सेना आणि जिल्ह्यातील सर्व ख्रिश्चन संघटनांनी जिल्हाधिकारी डॉ. अमोल येडगे साहेब यांना निवेदन देऊन पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आणि त्यांचे आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
जत मतदार संघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील यशवंत नगर येथे बोलताना, बैलगाडी शर्यतीप्रमाणेच ख्रिश्चन धर्मगुरुंना मारण्यासाठी 11 लाखांचे बक्षीस देण्याचे वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे केवळ ख्रिश्चन धर्मगुरुच नव्हे, तर महाराष्ट्रातील समस्त ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्या ख्रिश्चन बांधवांची मते घेऊन पडळकर आमदार झाले, त्यांनाच ते विसरले असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
या वादग्रस्त विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त करत आहे. बहुजन पॅंथर सेना, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने पडळकर यांची आमदारकी रद्द करण्याची, त्यांनी ख्रिश्चन समाजाची माफी मागण्याची आणि शासनाने त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
याच निषेधार्थ दि. 07/07/2025 रोजी (सोमवारी) बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध यात्रा काढण्यात आली. व्हिनस कॉर्नर येथील राजाराम महाराजांच्या स्मारकापासून दुपारी 2 ते 4 या वेळेत ही निषेध यात्रा निघाली, ज्यात कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला काळे फासून आपला निषेध व्यक्त केला. बहुजन पॅंथर सेनेसह ख्रिश्चन समाजातील विविध संघटनांनी पडळकर यांच्या जातीयवादी आणि वादग्रस्त विधानाचा जाहीर निषेध केला आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अमोल येडगे साहेब यांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ख्रिश्चन बांधवांकडून आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.संस्थापक अध्यक्ष निशाताई बचुटे मॅडम पश्चिम महाराष्ट्र संघटक बिपिन जोसेफ खिलारे राष्ट्रीय अध्यक्ष भारत गोंधळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुनील कांबळे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण जाधव पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश खैरमोडे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजू अवघडे कोल्हापूर जिल्हा सचिव बापू आवळे शिये शाखा अध्यक्ष वैभव शिर्के व प्रणित खांडेकर आणि इतर सर्व बहुजन पँथर चे सर्व पदाधिकारी तळसंदे शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोडोली चर्च ख्रिश्चन बांधव संभापूरचे ख्रिश्चन बांधव शियेक ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.