महाराष्ट्र ग्रामीण

गांधीनगरमध्ये तरुणाचा खून: किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून घडला प्रकार, सात संशयित ताब्यात!

गांधीनगर (सलीम शेख ) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय तरुणाचा दगड आणि लाकडी बॅटने मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गांधीनगर (ता. करवीर) येथे घडली आहे. आशुतोष सुनील आवळे (वय २६, रा. आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) तातडीने कारवाई करत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.


या घटनेप्रकरणी शंकर बापू बनसोडे (वय १९), राजू सचिन काळोखे (वय २०), शुभम संजय कांबळे (वय १९), करण महेश डांगे (वय १८, सर्व रा. गांधीनगर) आणि तीन विधीसंघर्षग्रस्त बालके अशा एकूण सात जणांना गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
रविवारी रात्री उशिरा सुनील आवळे यांनी गांधीनगर येथील पंचगंगा नदीच्या काठी आपल्या मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह येथील वसाहत रुग्णालयात पाठवला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर सुनील आवळे यांनी आपल्या मुलाचा खून झाल्याची फिर्याद पोलिसांत दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह चार तपास पथके तयार करून तपासाला सुरुवात केली. अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कोयना वसाहत येथून करण डांगे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.


शनिवारी (५ जुलै) रात्री ११ वाजता तो त्याचे मित्र शंकर बनसोडे, राजू काळोखे, शुभम कांबळे आणि इतर तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांसोबत मोबाईलवर गेम खेळत असताना आशुतोष आवळे तिथे आला. नशेत असलेल्या आशुतोषने करणला “इथे काय करताय” असे विचारत शिवीगाळ केली. तसेच आशुतोषने आपल्याकडील ‘एडका’ हे हत्यार दाखवून मारहाण करण्यास सुरुवात केली. आशुतोष काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने करण आणि त्याच्या मित्रांनी त्याला दगड आणि लाकडी बॅटने मारहाण केली. यामध्ये आशुतोषचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर सर्वांनी मिळून पंचगंगा नदीच्या शांतीप्रकाश घाटावर नदीकाठी त्याचा मृतदेह फेकून दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्वजण पळून जाण्याच्या तयारीत होते. करणला त्याच्या घरातून, शंकर आणि राजूला तावडे हॉटेल परिसरातून तर शुभम आणि इतरांना गांधीनगर परिसर, कावळा नाका आणि एस.टी. स्टँड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी या सर्वांना गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
या तपासकार्यात पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, राजू कांबळे, शिवानंद मठपती, विशाल खराडे, संतोष बरगे, अमित मर्दाने, अरविंद पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. खुनाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यास भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button