गणेश विसर्जनाला प्रशासनाने आडकाठी आणू नये: हिंदु जनजागृती समितीचे निवेदन!

कोल्हापूर (सलीम शेख) : हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण मंडळाला निवेदन देऊन गणेशोत्सव काळात गणेश मूर्तींच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला कोणतीही आडकाठी आणू नये, अशी मागणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिका प्रशासन वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाला प्रदूषणासाठी जबाबदार धरत असल्याचा आरोप समितीने केला.
समितीच्या मते, वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यामुळे होणारी पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी कोणतीही ठोस कृती केली जात नाही. मात्र, गणेशोत्सवातच जलप्रदूषणाचे कारण पुढे करून गणेश मूर्तींच्या विसर्जनाला विरोध केला जातो. अनेक ठिकाणी भाविकांना बळजबरीने कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास भाग पाडले जात आहे, असे समितीने निवेदनात म्हटले आहे.
हिंदु जनजागृती समितीने प्रशासनाला “कृत्रिम तलाव” आणि “गणेश मूर्तीदान” यांसारख्या “अशास्त्रीय संकल्पना” राबवू नयेत, अशी विनंती केली आहे. तसेच, गणेशोत्सव काळात पंचगंगा नदीत श्रीगणेश विसर्जनास अनुमती मिळावी, अशी प्रमुख मागणीही त्यांनी केली.
हे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रदूषण मंडळ यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार स्वप्नील पवार यांनी, तर प्रदूषण मंडळ येथे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे दिलीप भिवटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपशहरप्रमुख शशी बीडकर, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक सुनील सामंत, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव आणि आप्पासाहेब गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, विश्व हिंदु परिषदेचे प्रकाश कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, आदित्य शास्त्री, मधुकर नाझरे, आणि सनातन संस्थेचे दिलीप सातपुते हे उपस्थित होते.