कोल्हापूरमध्ये चरस-गांजा विक्री करणाऱ्याला अटक; ९७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर शहरात अवैधरित्या चरस आणि गांजाची विक्री करणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धडक कारवाई करत अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २ किलो ६०० ग्रॅम गांजासह ४४ ग्रॅम चरस असा एकूण ९७,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी अवैध अंमली पदार्थांचा साठा, विक्री करणारे तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी लक्ष्मीपुरी परिसरात सापळा रचला. गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमास नाव-पत्ता विचारला असता, त्याने आपले नाव इरफान खलील मोदी (वय ३७, रा. १७०८ सी वॉर्ड, गंजी गल्ली, सोमवार पेठ, कोल्हापूर) असे सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यातील पिशवीमध्ये २ किलो ६०० ग्रॅम वजनाचा गांजा आणि ४४ ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण ९७,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. इरफान मोदी याच्या ताब्यात मिळालेला गांजा योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला आहे.
गांजा व चरस विक्री करणारा आरोपी इरफान खलील मोदी यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेस एन.डी.पी.एस. कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने त्याच्या ताब्यात मिळालेला गांजा अंमली पदार्थ कोठून व कोणाकडून आणला आहे, याचा तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, शिवानंद मठपती, योगेश गोसावी, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, संतोष बरगे, प्रदीप पाटील आणि अरविंद पाटील यांनी केली आहे.