प.पू. श्री गगनगिरी महाराज गुरुपौर्णिमा महोत्सव श्री क्षेत्र गगनगड येथे उत्साहात साजरा!

दुधवंडे, ता. गगनबावडा (विलास पाटील ) : विश्वविख्यात योगीराज गगनगिरी महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदाही त्यांच्या लाखो भाविकांनी महाराजांच्या आवडत्या आणि निसर्गरम्य श्री क्षेत्र गगनगड आश्रमात मोठ्या उत्साहात साजरा केला.
बुधवार, ९ जुलै रोजी या धार्मिक उत्सवाला सुरुवात झाली असून, शुक्रवार, ११ जुलै रोजी त्याची सांगता होईल. या निमित्ताने आश्रमस्थानी भजन-कीर्तन-प्रवचन, नामस्मरण, होमहवन-भंडारा आदी विविध धार्मिक विधींचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमेचा पावन दिवस
गुरुपौर्णिमेच्या परम पावन दिनी, गुरुवार, १० जुलै रोजी पहाटे ५ वाजल्यापासून श्रींच्या मूर्तीवर वेदमंत्रांच्या पवित्र घोषात मंगल स्नान घालण्यात आले. त्यानंतर पादुकांवर पूजा-अभिषेक झाल्यानंतर संपूर्ण समाधीस्थानी विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आणि मुख्य दर्शनाला प्रारंभ झाला. सकाळी ७ वाजता पद्यपूजा झाल्यावर दिवसभर दर्शन कार्यक्रम सुरू होता. सकाळी १०:३० वाजता होमहवन संपन्न झाले आणि रात्री ८:३० वाजता महाआरतीचा कार्यक्रम पार पडला. भाविक भक्तांच्या सोयीसाठी सकाळी १० वाजल्यापासून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
सहभागाचे आवाहन
या उत्सवाची सांगता शुक्रवार, ११ जुलै रोजी होणार आहे. संजयदादा पाटणकर सरकार यांनी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी गगनगड आश्रमस्थानी येऊन योगीराज गगनगिरी महाराजांच्या पादुकांचे दर्शन आणि आशीर्वादाचा लाभ घ्यावा, तसेच आश्रम संस्थेने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे