जर्गी उपकेंद्रामुळे धुंदवडे खोऱ्याला पावसाळ्यात मोठा दिलासा, शाखा कार्यालयाची मागणी!

धुंदवडे (विलास पाटील ) : गगनबावडा तालुक्यातील जर्गी येथे गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून महावितरणचे उपकेंद्र कार्यान्वित झाल्याने धुंदवडे खोऱ्यातील जनतेला पावसाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. या उपकेंद्रामुळे आतापर्यंत पावसाळ्यात एकाही दिवशी पूर्ण वेळ वीजपुरवठा खंडित झालेला नाही, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, जर्गी येथे महावितरणचे शाखा कार्यालय व्हावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
जर्गी येथील उपकेंद्रामुळे धामणी खोऱ्यातील ३० हून अधिक गावांना घरगुती, शेती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी वीजपुरवठा होतो. यापूर्वी दरवर्षी पावसाळ्यात धुंदवडे खोऱ्यात आठ-आठ दिवस वीजपुरवठा खंडित होत असे, ज्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागे आणि मोबाईल, टीव्हीसह सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडत असत. पण जर्गी उपकेंद्रामुळे ही समस्या आता दूर झाली आहे.
शाखा कार्यालयाची मागणी का?
नवीन वीज कनेक्शन, दुरुस्ती आणि ग्राहकांसाठीच्या विविध योजनांसारख्या कार्यालयीन कामांसाठी आजही धुंदवडे खोऱ्यातील नागरिकांना गगनबावडा येथील महावितरण कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. तासाभराच्या कामासाठी पूर्ण दिवस खर्च होतो, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. जर्गी येथे शाखा कार्यालय झाल्यास शाखा अभियंता, उप अभियंता, लाईनमन आणि सहाय्यक लिपिक यांसारख्या पदांवर नेमणुका होतील, ज्यामुळे जनतेची मोठी सोय होईल.
धामणी मध्यम प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, या पावसाळ्यात पाटबंधारे विभागाने १.५ टीएमसी पाणी अडवले आहे. यामुळे नदीवरील उपसा सिंचनासाठी शेती पंपाच्या कनेक्शनची मागणी वाढणार आहे. ही वाढती मागणी लक्षात घेता, महावितरण प्रशासनाने जर्गी येथे तातडीने शाखा कार्यालय सुरू करावे, अशी मागणी शेतकरी तानाजी पाटील यांनी केली आहे. या मागणीला स्थानिक नागरिकांकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे.