महाराष्ट्र ग्रामीण

यांत्रिकीकरणामुळे ‘सर्जा-राजा’ची हाक होतेय दुर्मिळ: धुंदवडे खोऱ्यात बदलत्या शेतीचे चित्र!

धुंदवडे (विलास पाटील) : एकेकाळी धुंदवडे खोऱ्यातील भातशेतीची ओळख असलेल्या सर्जा-राजाच्या जोडीची आणि त्यांना हाक देणाऱ्या बळीराजाची पारंपरिक ओवी आता दुर्मिळ होत चालली आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे वेगवान झाली असली तरी, या बदलामुळे पारंपरिक शेती आणि त्यासोबत जोडलेल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग लोप पावत असल्याचे चित्र आहे.
यंदा पावसाची लवकर सुरुवात झाल्याने धुंदवडे खोऱ्यात भातशेतीसाठी आवश्यक असणारी ‘तरवा’ (भात रोपे) उत्तम वाढली आहेत. डोंगराळ भागात भात लागवडीसाठी जास्त पाण्याची गरज असल्याने आणि सध्या धामणी खोऱ्यात पा शेतीसाठी अनुकूल पाऊस झाल्याने सर्व शेतकरी सध्या रोप लागणीत व्यस्त आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात बैलांचे औत दिसायचे. या बैलांच्या साहाय्याने शेतीची नांगरणी करून चिखलगुट्टा केला जात असे आणि नंतर रोप लागण केली जात असे. त्यावेळी बळीराजा आपल्या सर्जा-राजाला हाक देताना किंवा पारंपरिक ओवी गुणगुणताना दिसत असे, जो आता एक दुर्मिळ अनुभव बनला आहे.


आधुनिकतेकडे शेतकऱ्यांचा कल सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत, शेतकऱ्यांच्या शेतात बैलांच्या औताऐवजी पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टर दिसत आहेत. ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरमुळे शेतीची नांगरट आणि रोप लागण जलद गतीने होते, तसेच त्यासाठी लागणारा खर्चही कमी होतो. त्यामुळे अनेक शेतकरी सर्जा-राजाच्या बैलजोडीऐवजी या यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत. धुंदवडे येथील प्रगतशील शेतकरी युवराज पाटील यांनी सांगितले की, “ट्रॅक्टर व पॉवर टिलरमुळे शेतीची नांगरणी व रोप लागण जलद होते व त्यासाठी लागणारा खर्चही कमी होतो, त्यामुळे काही शेतकरी सर्जा-राजाच्या बैलजोडीऐवजी यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत.”
या आधुनिक शेतीमुळे कामाचा वेग वाढला असला तरी, यांत्रिकीकरणामुळे आपण आपल्या सर्जा-राजाच्या जोडीला विसरत चाललो आहोत, ही बाब विचार करायला लावणारी आहे. शेतीमध्ये झालेले हे बदल काळाची गरज असले तरी, त्यासोबत येणारे सांस्कृतिक बदलही तितकेच महत्त्वाचे आहेत. पारंपरिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यात समन्वय साधणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतीचा विकास होईल आणि आपली समृद्ध कृषी संस्कृतीही जपली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button