सह्यगिरीची अनोखी वारी: आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावले सह्यगिरी परिवार, बांधकाम साहित्य सुपूर्द!

साखरी ता. गगणबावडा (सलीम शेख ) : आषाढी वारीचे औचित्य साधून ‘रंजल्या-गांजल्यांना मदत करणे हीच आमची वारी’ हे ब्रीदवाक्य जपत सह्यगिरी परिवाराने साखरी येथील एका आपद्ग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. आठ दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे या गरीब कुटुंबाचे नव्याने बांधलेले घर जमीनदोस्त झाले होते. सुदैवाने कुटुंबातील सदस्य रुग्णालयात असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे स्वप्न क्षणार्धात उद्ध्वस्त झाले.
या घटनेची माहिती मिळताच सह्यगिरी परिवार या कुटुंबाच्या मदतीला धावला. नवीन घराच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला क्रस्टँड वाळूचा एक ट्रॅक्टर घेऊन सह्यगिरीचे सदस्य आज या कुटुंबाच्या दारात पोहोचले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे बांधकाम साहित्य कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले.
यावेळी सह्यगिरीचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले की, “ही केवळ मदत नसून आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचा प्रसाद समजून ती स्वीकार करावी. तसेच, येत्या काळात घर बांधकामासाठी काही कमी पडल्यास हक्काने मागणी करावी,” असा आधार त्यांनी आपद्ग्रस्त कुटुंबाला दिला.
या प्रसंगी सह्यगिरीचे शिलेदार तानाजी घाडगे, संजय देसाई, रखमाजी पाटील, के.डी. जाधव, सुप्रीम शिंदे, तुषार शिंदे, तसेच साखरी गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मेंगाणे, सुरेश खांदारे, मारुती चौगले, संजय घाटगे, अमर कोटकर आणि अंगणवाडी सेविका वर्षा चौगले आदी उपस्थित होते. सह्यगिरी परिवाराने केलेल्या या मदतीमुळे इतरांनाही प्रेरणा मिळाली आहे.