पीएम श्री केंद्रीय प्राथमिक शाळा असंडोलीचा ‘चला जाऊ शेतावर’ उपक्रम: विद्यार्थ्यांनी अनुभवला भात लावणीचा पाऊसगंध!

गगनबावडा (सलीम शेख ) : गगनबावडा तालुक्यातील नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या पीएम श्री केंद्रीय प्राथमिक शाळा असंडोलीने ‘चला जाऊ शेतावर’ हा आगळावेगळा उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांचे कष्ट आणि भाकरीची गोष्ट याची प्रत्यक्ष अनुभूती दिली. या उपक्रमाने ग्रामीण शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाची नवी दिशा दाखवली आहे.
गगनबावड्याच्या कुशीत वसलेल्या असंडोली गावातील या शाळेने शिक्षणाच्या शिवारात अनुभवाची भातलावणी फुलवली. नुकताच शाळेतील विद्यार्थ्यांनी पावसाच्या साक्षीने आणि चिखलाच्या कुशीत प्रत्यक्ष भात लावणीचा अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांनी केवळ पाहणी न करता, शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकत बांध घालणे, नांगरणी करणे, दिंड फिरवणे, भाताचे तरू काढणे आणि रोप लावणे अशी सर्व कामे पावसाच्या सरींसोबत भिजत, मोठ्या आनंदाने केली. “किती गोड हा श्रमाचा सुगंध!” असे उद्गार त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट करत होते. शेती म्हणजे केवळ अन्नधान्याचा स्रोत नव्हे, तर ती संस्कृती, परंपरा आणि मेहनतीचे प्रतीक आहे, हे या चिमुकल्यांनी स्वतः अनुभवले आणि अंगीकारले.
या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक भैरवनाथ शिंदे यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि रघुनाथ शिंदे, प्रमोद पोवार, दीपक गायकवाड, अमृता पाटील, दीपाली पोवार, सुप्रीम शिंदे, पूनम नाईक, अरुणा उगवे या शिक्षकवर्गाचे जिवंत मार्गदर्शन लाभले. हे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसोबत शेतात उतरले, आणि खऱ्या अर्थाने ‘गुरु’ या शब्दाला साजेसे योगदान दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचे, शेतीच्या श्रमसौंदर्याचे आणि अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेचे वास्तवदर्शी दर्शन घडले. या चिमुकल्यांनी केवळ मातीला स्पर्श केला नाही, तर ती माती त्यांच्या मनात रुजली आहे – उद्याच्या सुजाण नागरिकांचे बीज या मातीत रोवले गेले आहे, असे मुख्याध्यापक शिंदे यांनी सांगितले.