लाच घेताना महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात: गडहिंग्लजमध्ये खळबळ!

गडहिंग्लज (सलीम शेख ) : एका अपघात प्रकरणात जप्त केलेले वाहन सोडवण्यासाठी आणि गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी ४०,००० रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) नीता शिवाजी कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे गडहिंग्लज पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलावर गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि त्यामध्ये त्यांचे वाहन जप्त करण्यात आले होते. हे वाहन सोडवण्यासाठी आणि गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी ASI नीता शिवाजी कांबळे यांनी तक्रारदाराकडे ६०,००० रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर, ५ जुलै २०२५ रोजी ४०,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीतच पकडले.
या प्रकरणी, लोकसेविका नीता शिवाजी कांबळे यांच्या विरोधात गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हवालदार संदीप काशीद, सुधीर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता गावडे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील आणि संदीप पोवार या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली