महाराष्ट्र ग्रामीण

गडहिंग्लजच्या प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा; अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत जागेचा प्रश्न सुटला!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्याचा उपजिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडहिंग्लज शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या प्रशासकीय इमारतीचा गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित असलेला जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
गडहिंग्लज शहरातील आजरा रस्त्यावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या १२२ गुंठे जागेपैकी ७५ गुंठे जागा प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित ४७ गुंठे जागा पशुसंवर्धन विभागाकडेच राहणार आहे. प्रशासकीय इमारतीसाठी जागा उपलब्ध करणे आणि नियोजन विभागामार्फत त्यावर इमारत बांधणे हाच या बैठकीचा मुख्य विषय होता.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता आणि नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांना आगामी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पासाठी बजेटची तरतूद करण्याचे आदेश दिले. तसेच, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब हजारे यांना ताबडतोब अंदाजपत्रक तयार करून गडहिंग्लजमधील सर्व सरकारी कार्यालये समायोजित होतील, अशा व्यापक आराखड्याची निर्मिती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानण्यात आले. या बैठकीत आमदार हसन मुश्रीफ यांचीही उपस्थिती होती.


या प्रशासकीय भवनाच्या बांधकामानंतर गडहिंग्लज-चंदगड प्रांताधिकारी कार्यालय, आजरा-चंदगड पोलीस उपाधीक्षक कार्यालय, उत्पादन शुल्क कार्यालय, गडहिंग्लज तहसीलदार, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार विभाग, वैधमापन विभागाचे वजनकाटे निरीक्षक, तलाठी कार्यालय यांसारख्या अनेक कार्यालयांना स्वतःची हक्काची आणि एकत्रित इमारत मिळणार आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, वित्त विभागाचे सचिव ओ. पी. गुप्ता, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामा स्वामी, नियोजन विभागाचे सचिव डॉ. राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि निवासी जिल्हाधिकारी संजय तेली हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. याव्यतिरिक्त, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवानंद ढेकळे, माजी उपनगराध्यक्ष किरणअण्णा कदम, माजी नगराध्यक्ष बसवराज खनगावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, युवक शहराध्यक्ष रामगोंडा उर्फ गुंडेराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर, माजी उपनगराध्यक्ष हरून सय्यद, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष महेश सलवादे, रचना सहाय्यक विशाल बेंडखळे, विनोद बिलावल आदी प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button