गोकुळ शिरगावसाठी पाणीटंचाईतून सुटकेची आशा; MIDC कडून पाणीपुरवठ्याची मागणी!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या गोकुळ शिरगाव गावाला भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईतून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा स्त्रोत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक यांनी एमआयडीसी कडूनच गोकुळ शिरगावला चार इंची कनेक्शनद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
हे चार इंची पाणी कनेक्शन उपलब्ध झाल्यास गोकुळ शिरगाव ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण थांबेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे.
यावेळी आमदार अमल महाडिक, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, उपसरपंच शामराव पाटील, रणजीत पाटील यांच्यासह गोकुळ शिरगाव येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. एमआयडीसी च्या या सकारात्मक प्रतिसादाने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढील काळात यावर तातडीने अंमलबजावणी होऊन गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटेल अशी मागणी ग्रामस्थांनी केली.