लैंगिक शोषणाबाबत जनजागृती काळाची गरज: सपोनि मगदूम यांचे प्रतिपादन!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : सध्याच्या काळात मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, लहान मुलींना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी ‘गुड टच, बॅड टच’ या संकल्पनेवर आधारित जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) टी.जे. मगदूम यांनी केले.
हलसवडे गावातील विद्यामंदिर हलसवडे आणि दत्त माध्यमिक विद्यालयातील किशोरवयीन मुलींशी नुकताच संवाद साधताना सपोनि मगदूम बोलत होत्या. पालकांनीही आपल्या मुलांशी अशा नाजूक विषयांवर मोकळेपणाने संवाद साधायला हवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सततच्या या जनजागृती मोहिमेमुळे लहान मुलींमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, तसेच भविष्यात लैंगिक शोषणाचे प्रमाण कमी होण्यासही याची मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी मुलींना चाईल्ड हेल्पलाईन १०९८, निर्भया पथक आणि डायल ११२ या मदत सेवांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, शाळेत बसवण्यात आलेल्या निर्भया पथक तक्रार पेटीची पाहणीही सपोनि मगदूम यांनी केली.
या कार्यक्रमाला हलसवडेच्या माजी सरपंच उज्ज्वला दांडगे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, पोलीस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. लैंगिक शोषणासारख्या गंभीर विषयावर समाजात अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली.