गोकुळ शिरगावमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्याची आत्महत्या: कारण अस्पष्ट!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात शनिवारी (५ जुलै २०२५) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दिग्विजय पांडुरंग पाटील (वय २२, रा. सिंहगड कॉलनी, खंडोबा माळ, लोहगाव, पुणे, मूळ गाव आकुर्डे, ता. गारगोटी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता.
याप्रकरणी नागनाथ वीरभद्रप्पा आनंदवाडे यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिग्विजय गेल्या तीन वर्षांपासून याच अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता आणि नागनाथ आनंदवाडे यांच्या मालकीच्या खोलीत तो भाड्याने राहत होता. त्याने आपल्या खोलीतील बेडरूममध्ये गळफास घेऊन जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृताच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. दिग्विजयच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, नुकताच त्याचा अभियांत्रिकीचा निकाल लागला होता आणि त्यात त्याला कमी गुण मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
दिग्विजयचे वडील सैन्यदलातून निवृत्त झाले असून, त्याला एक लहान भाऊ आहे. या घटनेमुळे महाविद्यालयाच्या परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.