गोकुळ शिरगावात दुर्मिळ ‘ओलिअँडर हॉक-मॉथ’ फुलपाखरू पाहून नागरिक थक्क!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव येथील उदयराज मोबाईल व इलेक्ट्रिकल शॉपीमध्ये एक अत्यंत दुर्मिळ आणि आकर्षक पतंग (फुलपाखरू) आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. हा पतंग ‘ओलिअँडर हॉक-मॉथ’ (Daphnis nerii) प्रजातीचा असल्याचे समोर आले आहे.
विकिपीडियावरील माहितीनुसार, या पतंगाचे वैज्ञानिक नाव डॅफनिस नेरी (Daphnis nerii) असे असून, त्याची नोंद एका महत्त्वाच्या पुस्तकात केलेली आहे. या पतंगाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे त्याचे मोठे आणि आकर्षक पंख, जे हिरव्या रंगाचे असून त्यावर गुलाबी आणि तपकिरी रंगाचे नमुने आहेत. या रंगामुळे तो पानांमध्ये सहजपणे मिसळून जातो. हा पतंग प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आढळतो.
भर वस्तीतील दुकानात हा दुर्मिळ पतंग आढळल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. दुकानाच्या मागील बाजूस शेती असल्याने, हा पतंग त्या दिशेने आला असावा अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. या दुर्मिळ पाहुण्याला पाहण्यासाठी दुकानात नागरिकांनी गर्दी केली होती.
या पतंगाच्या अळ्या प्रामुख्याने ओलिअँडर (कनेर) सारख्या वनस्पतींची पाने खातात. शहरी वस्तीत असा दुर्मिळ पतंग दिसणे ही एक आगळीवेगळी घटना असून, यामुळे निसर्गप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.