गोकुळ शिरगावात ढगफुटीतून वाचलेल्या सुरेशला अखेर मृत्यूने गाठले!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : काही दिवसांपूर्वी गोकुळ शिरगाव येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेतून ओढ्यातून वाहून जाण्यापासून बचावलेल्या सुरेश नायर (वय ३८, मूळ रा. तामिळनाडू) यांचा राहत्या खोलीत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल, शनिवारी उघडकीस आली. ढगफुटीच्या दिवशी स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून सुरेशला वाचवले होते, मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी गोकुळ शिरगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. या जोरदार पावसामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर सुरेश नायर ओढ्यातून वाहत होते. ते एका लोखंडी कठड्याला आदळल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी गोकुळ शिरगाव येथील काही धाडसी तरुणांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना पाण्याच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले होते.
या घटनेनंतर सुरेश यांची प्रकृती चिंताजनक बनली होती आणि ते गंभीर आजारी पडले होते. सुरेश नायर हे परप्रांतीय असून, गोकुळ शिरगाव हद्दीतील एका सिमेंट पाइप कारखान्यात वॉचमन म्हणून काम करत होते. गेल्या पंधरा वर्षांपासून ते तिथे एकटेच राहत होते.
त्यांच्या शेजाऱ्यांना ते मृतावस्थेत आढळून आले. ढगफुटीतून वाचलेल्या सुरेशचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.