कोल्हापुरातून पुढील वर्षाच्या हज यात्रेसाठी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात!

कोल्हापूर (कोल्हापूर टाइम्स न्यूज नेटवर्क) : इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी पुढील वर्षाकरिता (२०२६) अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शुक्रवार, दिनांक ११ जुलैपासून सुरुवात होणार आहे. केंद्रीय हज समिती आणि महाराष्ट्र राज्य समितीने याबाबतची घोषणा केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंना मुस्लिम बोर्डिंग येथे शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून आपले अर्ज भरता येणार आहेत. इच्छुकांनी आपला पासपोर्ट, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रक्तगट माहिती, तसेच वारसदाराची माहिती व त्याचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक ही आवश्यक कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती सोबत आणण्याचे आवाहन कोल्हापूर हज फाऊंडेशन व लिम्रास चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त भाविकांनी हज यात्रेसाठी नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.