हातकणंगले येथे बेकायदेशीर मुरूम उत्खननप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल!

हातकणंगले (सलीम शेख ) : हातकणंगले गावच्या हद्दीत बिगरशेती क्षेत्रात कोणतीही परवानगी नसताना मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
मंडळ अधिकारी अरुण दत्तात्रय पुजारी (वय ५७, रा. मिरज) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी दुपारच्या सुमारास हातकणंगले गावच्या हद्दीतील जवळील जुना विजापूर-रत्नागिरी रस्त्यालगत हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणात चंद्रकांत दत्तात्रय इंगवले (वय ६८, रा. जवाहरनगर, इचलकरंजी), शिवप्रताप भवरलाल मर्दा (वय ७३, रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर), आणि श्रीरंग बळवंत कामत (वय ६९, रा. पुलाची शिरोली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी चंद्रकांत इंगवले यांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनीतून मुरूम काढून तो खासगी जागेत टाकला होता. या कामासाठी जेसीबी, ट्रॅक्टर आणि नंबर नसलेला ट्रॅक्टर-ट्रेलर वापरण्यात आला होता.
या प्रकरणी कोणताही माल जप्त करण्यात आलेला नसून, हातकणंगले पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पटेकर करत आहेत.