वडार समाजाला बांधकाम कामगार योजनेचा लाभ द्या: आ. डॉ. अशोकराव माने यांची विधिमंडळात मागणी

हातकणंगले (सलीम शेख ) : हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोकराव माने यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वडार समाजाला बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळावा, तसेच संजय गांधी निराधार योजनेतील उत्पन्नाची मर्यादा वाढवावी, असा औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
सभागृहात बोलताना डॉ. माने म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कामगार विभागामार्फत बांधकाम कामगारांना विविध योजनांद्वारे लाभ दिला जातो. बांधकाम व्यवसायाशी निगडीत जवळपास १३ प्रकारचे कामगार या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, बांधकाम व्यवसायाला लागणारा कच्चा आणि पक्का माल, उदा. खडी, मुरुम, दगड पुरवणाऱ्या महाराष्ट्रातील वडार समाजाला या योजनेचा लाभ मिळत नाही. यामुळे वडार बांधवांचे मोठे नुकसान होत असून, त्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होऊन त्यांना बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच, महाराष्ट्र राज्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण मागणी केली. वृद्ध, अनाथ, दिव्यांग, विधवा, तृतीयपंथी तसेच जे लोक स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाहीत, अशा सर्वसामान्य जनतेकरीता ही योजना आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा ६० हजार इतकी करावी, वयाची मर्यादा कमी करून ६० वर्षे करावी आणि लाभार्थ्यांना मिळणारी मासिक पेन्शन रक्कम वाढविण्यात यावी, अशी मागणीही आमदार डॉ. अशोकराव माने यांनी यावेळी केली.