महाराष्ट्र ग्रामीण

HSRP नंबर प्लेट फसवणूक: बनावट वेबसाईटचा सुळसुळाट, नागरिक त्रस्त, गुगलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

कोल्हापूर (इरफान मुल्ला): महाराष्ट्रात सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बंधनकारक करण्यात आल्यानंतर, ऑनलाइन नोंदणी आणि पेमेंटसाठी शासनाने अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. मात्र, याच संधीचा गैरफायदा घेत काही बनावट वेबसाईट्सनी नागरिकांना लुबाडण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः, या बनावट वेबसाईट गुगल सर्चवर पहिल्या क्रमांकावर दिसत असल्याने अनेक नागरिक या फसवणुकीचे बळी ठरत आहेत, ज्यामुळे गुगलच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा नागरिक HSRP नंबर प्लेटच्या नोंदणीसाठी गुगलवर शोध घेतात, तेव्हा ही बनावट वेबसाईट सर्वात आधी दिसते. ही वेबसाईट शासनाच्या अधिकृत वेबसाईटसारखीच हुबेहूब दिसत असल्याने, नागरिक सहजपणे फसतात. नागरिकांनी या वेबसाईटवर वाहनाची सर्व माहिती भरल्यानंतर ऑनलाइन पेमेंट केले जाते. मात्र, पेमेंट झाल्यानंतरच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येते. पैसे भरूनही नंबर प्लेटची नोंदणी होत नाही आणि नागरिकांचे पैसे वाया जातात.
गुगलसारख्या मोठ्या सर्च इंजिनवर अशा फसव्या वेबसाईट पहिल्या क्रमांकावर कशा येतात, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कोट्यवधी नागरिक रोज गुगलचा वापर करत असताना, अशा बनावट साईट्सना प्राधान्य मिळाल्याने फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, प्रशासनासोबतच गुगलनेही अशा फसव्या वेबसाईटवर अंकुश लावण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांनी HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि केवळ अधिकृत शासकीय वेबसाईटचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button