शहापूरमध्ये जबरी चोरी उघड – आरोपीकडून १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त!

शहापूर (सलीम शेख) : इचलकरंजी पोलिसांनी केलेल्या तात्काळ कारवाईत जबरी चोरी प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण १ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे शहापूर परिसरातून जबरी चोरी करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ८ जुलै २०२५ रोजी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी संदेश सुनील पाटील (वय १८, रा. कबनूर) हे आपल्या टीव्हीएस ज्युपिटर मोपेडवरून सांगली नाका ते शहापूर चौक या मार्गाने जात होते. त्यावेळी आरोपी आदित्य लक्ष्मण भस्मे (वय २५, रा. थोरात चौक, इचलकरंजी) याने त्यांना लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने थांबवले. त्यानंतर मोपेड उभी करण्यास सांगून फिर्यादीस शिवीगाळ केली, धमकी दिली आणि त्यांच्या खिशातील १,२०० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. एवढेच नव्हे तर, फिर्यादीची टीव्हीएस ज्युपिटर मोपेड घेऊन आरोपी पसार झाला होता.
या घटनेनंतर फिर्यादी संदेश पाटील यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपी आदित्य भस्मेला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली टीव्हीएस ज्युपिटर मोपेड (किंमत ८०,००० रुपये), रोख रक्कम १,२०० रुपये, तसेच आणखी एक हिरो होंडा डिलक्स मोटरसायकल (किंमत २०,००० रुपये) आणि चार लाल रंगाच्या निळ्या व पिवळ्या पट्ट्यांच्या गॅस सिलिंडर टाक्या (किंमत १०,००० रुपये) असा एकूण १ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक (गड विभाग) अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, तसेच पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, सतीश कांबळे, रोहित डावळे, अर्जन फातले, अयुब गडकरी, शशिकांत ढोणे, कलमाकर ढाले आणि चालक श्रीविक सोनवणे यांनी केली.
आरोपीस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दरेकर हे करीत आहेत.