इचलकरंजीत बनावट मद्य निर्मिती अड्ड्यावर छापा; सुमारे ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

इचलकरंजी (सलीम शेख ) : राज्य उत्पादन शुल्क विभाग, इचलकरंजी पथकाने शिरढोण (ता. शिरोळ) आणि नदिवेशनाका परिसरात बनावट मद्य तयार करण्याच्या अड्ड्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा व साहित्य जप्त केले आहे. २१ जुलै २०२५ रोजी केलेल्या या कारवाईत सुमारे ९४,९४१/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत, राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी पथकाने १२ बाटल्या ९० मिलीच्या बनावट देशी मद्याच्या (जी.एम. डॉक्टर ब्रँड),अंदाजे २४ लिटर तयार देशी दारू ब्लेंड,
१८० मिलीच्या २४ बाटल्या देशी दारू टॅन्गो पंच,वापरलेली स्कूटर (MH-09-DS-3252), मोबाईल, बुचेस (टोपण) लावण्याचे मशीन,८२६ रिकाम्या मद्याच्या बाटल्या (देशी व विदेशी)
विविध ब्रँडचे लेबल्स, प्लास्टिक कॅन, प्लास्टिक पाईप, ग्राहकांची माहिती असलेली वही जप्त केली.
या प्रकरणी इचलकरंजी येथील अविनाश मधुकर गोलंगडे (वय ५७) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
निरीक्षक ए. एस. कोळी यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक एम. पी. खेत्री, एस. एस. हिंगे, अजित बोंगाळे, जवान वैभव शिंदे, सुभाष कोले, मुकेश माळगे व आदित्य कोळी यांनी ही यशस्वी कारवाई केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती असल्यास ती विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक ८४२२००११३३ वर कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे निरीक्षक ए. एस. कोळी यांनी सांगितले