इंगळी येथील भूस्खलनाचा प्रश्न चिघळला: शिवसेना (उबाठा) आंदोलनावर ठाम

इंगळी (सलीम शेख ) : इंगळी येथे शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत व आंदोलक बरोबर सर्व कामांची पाहणी झाली.इंगळी येथील सहा मोठ्या विहिरींपैकी एका विहिरीजवळ २५ मार्च २०२५ रोजी झालेल्या भूस्खलनामुळे गावातील ८ पानटपऱ्या आणि मुख्य रस्ता विहिरीत कोसळल्याने निर्माण झालेला प्रश्न आता अधिकच गंभीर बनला आहे. या घटनेनंतर काही दिवसांनी पुन्हा भिंतीचा काही भाग कोसळून स्थानिक नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि स्थानिक नागरिक या घटनेला जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाईपलाईन लीकेजला जबाबदार धरत आहेत.
या घटनेमुळे इंगळी आणि हुपरी गावांदरम्यानची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. न्यूज चॅनेलवरील बातम्यांमुळे आणि शिवसेना संघटनेच्या आंदोलनामुळे काही अधिकाऱ्यांनी शिवसेना शहर प्रमुख केशव नारायण पाटील यांची भेट घेऊन आंदोलकांच्या मागण्यांची पडताळणी केली. तसेच, लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आश्वासनही दिले.
मात्र, आश्वासन देऊनही काम सुरू न झाल्यास शिवसेना (उबाठा) केशव पाटील यांनी आपले उपोषण आंदोलन कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. भूस्खलनाचे मुख्य कारण जलजीवन मिशन अंतर्गत इंगळी गावात टाकण्यात आलेली पाईपलाईन असल्याचे सांगितले जात आहे. या पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात लीकेज असल्यानेच भूस्खलन झाले असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या कामाचे कंत्राटदार किशोर जामदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिवसेना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जोपर्यंत या ठिकाणी काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन आणि उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शिवसेना (उबाठा) संघटनेने केला आहे. यामुळे प्रशासन या गंभीर समस्येवर कधी तोडगा काढणार आणि नागरिकांना दिलासा कधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.