जयसिंगपूर घरफोडीचा गुन्हा १२ तासांत उघड; ३६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त!

जयसिंगपूर (सलीम शेख) : जयसिंगपूर, ता. शिरोळ येथील बीएसएनएल क्वार्टर्समध्ये झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवघ्या १२ तासांत उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून ३५०.३८ ग्रॅम सोन्याचे दागिने, २३८५ ग्रॅम चांदीचे दागिने आणि इतर वस्तूंसह एकूण ३६ लाख ७५ हजार ४१६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्ह्याची नोंद आणि तपास:
दिनांक १०/०७/२०२५ रोजी सकाळी १०.४० ते ११.१० वाजेच्या दरम्यान जयसिंगपूर येथील बीएसएनएल क्वार्टर्स, टाईप ०३, तिसरा मजला येथील सौ. सुनिता दिलीप केरीपाळे यांच्या राहत्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला होता. घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा एकूण १७ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर २८७/२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची तत्पर कारवाई:
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून तो उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. पोलीस अधीक्षक महोदयांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि पोलीस अंमलदारांचे तपास पथक तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.
आरोपीला अटक आणि मुद्देमाल जप्त:
गुन्ह्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून तपास सुरू असताना, पथकातील पोलीस अंमलदार महेश खोत आणि महेश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, गुन्ह्यातील चोरटा पाठीवर लाल रंगाची सॅक अडकवून शुगर मिल, कसबा बावडा परिसरात वावरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तपास पथकाने शुगर मिल, कसबा बावडा येथे सापळा रचून त्या इसमाला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने आपले नाव राजू रामय्या महादेपल्ली (वय ४६, सध्या रा. कनकीपाडू, विजयवाडा, राज्य आंध्र प्रदेश, मूळ रा. कोत्थवलसा, जि. विजयवाडा, राज्य आंध्र प्रदेश) असे सांगितले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु अधिक विश्वासात घेऊन कौशल्यपूर्वक तपास केला असता, त्याने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली.
आरोपीच्या ताब्यातून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला:
* सोन्याचे दागिने: एकूण ३५०.३८ ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने (मँगो हार, राणी हार, मोठे मंगळसूत्र, मोहन माळ, चैन, तोडे, नेकलेस, पाटल्या, अंगठ्या, मोती हार, लहान मंगळसूत्र, कानातील फुले, टॉप्स, कर्णफुले, नाकातील मुगवट) ज्यांची अंदाजित किंमत ३३ लाख ३० हजार ७२७ रुपये आहे.
* चांदीचे दागिने व वस्तू: एकूण २३८५ ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट, तांब्या, वाट्या, ग्लास, पान-सुपारी, तामण, फुलपात्र, पळी, पंचपात्र, आरती, करंडे, घंटी, अगरबत्ती पात्र, चमचे, मेखला, लहान वाटी, कडे, नारळ, पैजण, कॉईन, घुन खडकी, गणपतीची मूर्ती, ज्यांची अंदाजित किंमत ३ लाख ४० हजार ६४० रुपये आहे.
* रोख रक्कम: ३५०० रुपये (५०० रुपयांच्या ७ नोटा).
* इतर वस्तू: एक हिरव्या रंगाची मूठ असलेला मारतूद (किंमत ३०० रुपये), प्रायोरिटी कंपनीची लाल व राखाडी रंगाची सॅक (किंमत ५०० रुपये) आणि पांढऱ्या रंगाचा गॅलेक्सी ए ७१ मॉडेलचा मोबाईल हॅण्डसेट (किंमत १५,००० रुपये).
अशा प्रकारे एकूण ३६ लाख ७५ हजार ४१६ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत केला आहे. आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार महेश खोत, महेश पाटील, लखनसिंह पाटील, संजय कुंभार, सागर माने, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, संजय हुंबे, प्रकाश पाटील, सागर चौगले, राजेश राठोड आणि राजेंद्र वरंडेकर, अनिल जाधव यांच्या पथकाने केली आहे.