सीबीएस बसस्थानकाजवळील ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात, ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर शहरातील सीबीएस बसस्थानकासमोरील राजश्री लॉटरी सेंटर या दुकानगाळ्यात सुरू असलेल्या अवैध ऑनलाईन जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत तीन जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५४,०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक तेयोगेशकुमार गुप्ता यांनी कडक आदेश दिले आहेत. याच आदेशांनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सीबीएस परिसरातील राजश्री लॉटरी सेंटर या दुकानात काही व्यक्ती ऑनलाईन जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.
पथकाने तात्काळ छापा टाकत तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ‘प्ले लॉट’ ॲपवर सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारासाठी वापरण्यात येणारे एलसीडी मॉनिटर, सीपीयू, प्रिंटर, की-बोर्ड, माऊस, स्कॅनर आणि रोख रक्कम असा एकूण ५४,०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेले आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, तसेच पोलीस अंमलदार संजय देसाई, नवनाथ कदम, निवृत्ती माळी, सागर चौगले, प्रवीण पाटील, लखनसिंह पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.