जयसिंगपूर येथे खड्ड्यातील पाण्यात बुडून अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू!

जयसिंगपूर (सलीम शेख ) : शहरातील विसाव्या गल्लीतील वरेकर कॉलनी येथे टॉवरसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून अडीच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (२३ जुलै २०२५) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. रिदम महेंद्र राइ (रा. गल्ली नं.२०, सी.बी. पार्क वरेकर कॉलनी, जयसिंगपूर) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रिदमची आई वैद्यकीय कामासाठी सांगली येथे गेली होती, तर वडील महेंद्र हे सेंट्रिंगच्या कामावर गेले होते. घरात रिदम आणि त्याचा तेरा वर्षांचा भाचा असे दोघेच होते. खेळता खेळता रिदम आठ ते नऊ फूट खोल असलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडला. काही वेळाने तो न दिसल्याने कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर त्याचा मृतदेह खड्ड्यातील पाण्यात आढळून आला.
रिदमच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मिरज येथील शासकीय रुग्णालयात रात्री उशिरा करण्यात आले. या घटनेमुळे राइ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.