कळे येथील चव्हाण हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ!

कळे ता. पन्हाळा (सलीम शेख ) : कळे येथील चव्हाण हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा (MPJAY) शुभारंभ आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना कळे येथे उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी बोलताना आमदार नरके यांनी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही गोरगरीब नागरिकांसाठी वरदान असल्याचे सांगितले. चव्हाण हॉस्पिटलमध्ये ही योजना सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल, असे ते म्हणाले. तसेच, या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करत, राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, कळे गावचे सरपंच सुभाष पाटील, डॉ. उदय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील, कुंभी कारखाना संचालक अनिष पाटील, अनिल पाटील, जी. बी. मामा, शिवाजी देसाई, शिवाजी पाटील, शूरसेन पाटील, चव्हाण हॉस्पिटलचे भारत चव्हाण व चव्हाण कुटुंबातील सर्व सदस्य, हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर व स्टाफ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.