महाराष्ट्र ग्रामीण

भरधाव कारने विद्यार्थिनींना चिरडले: एक ठार, तिघी गंभीर जखमी

कुरुकली, ता. करवीर (सलीम शेख ) : कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील कुरुकली बसथांब्यावर एसटीची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात भरधाव वेगातील एका कारने (एमएच ०९ वीवी ५१०७) घुसून भीषण अपघात घडवला. या अपघातात प्रज्ञा दशरथ कांबळे (वय १८, रा. कौलव) या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर अस्मिता अशोक पाटील (रा. कौलव), श्रावणी उदय सरनोबत (रा. कसबा तारळे), आणि श्रेया वसंत डोंगळे (रा. घोटवडे) या तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी विद्यार्थिनी कुरुकली येथील बसस्थानकावर थांबल्या होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने नियंत्रण सुटून थेट विद्यार्थिनींच्या घोळक्यात प्रवेश केला. कार इतकी भरधाव होती की, प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीला कारने जवळपास शंभर फूट फरफटत नेले, ज्यामुळे तिचा दुर्दैवी अंत झाला. अन्य तिघी विद्यार्थिनीही कारखाली सापडून गंभीर जखमी झाल्या.
अल्पवयीन चालकाला अटक
अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. हा चालक राशिवडे बुद्रुक येथील असून तो अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातामुळे मृत प्रज्ञा कांबळे आणि जखमी विद्यार्थिनींच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रज्ञा ही तिच्या वडिलांची लाडकी होती. तिला उच्चशिक्षित करण्याचे त्यांच्या वडिलांचे स्वप्न या घटनेने अधुरे राहिले.
गंभीर जखमी झालेल्या अस्मिता पाटील हिची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडिलांच्या निधनानंतर तिची आई मोलमजुरी करून तीन मुलींचे शिक्षण पूर्ण करत आहे. या अपघातामुळे अस्मिताच्या उपचाराचा खर्च कसा पेलावा, या विवंचनेत तिचे कुटुंब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button