महाराष्ट्र ग्रामीण

कबनूरमध्ये प्रेमविवाहाच्या रागातून जीवघेणा हल्ला – पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

प्रेमविवाहातून युवकावर तलवारीने हल्ला: दोन आरोपी गजाआड, इतर फरारींचा शोध सुरू

इचलकरंजी ता. हातकणंगले (सलीम शेख ): प्रेमविवाहाच्या रागातून इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर तलवारीने गंभीर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना २० जुलै २०२५ रोजी आभार फाटा, कबनूर येथे दुपारी १२ वाजता घडली. या प्रकरणी गंभीर जखमी झालेल्या वैभव अनिल पुजारी (वय २३, रा. चंदूर) यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गतही कलमे लावण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव पुजारी यांनी त्यांच्या पत्नीसोबत प्रेमविवाह केल्यामुळे आरोपींनी वैमनस्यातून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी पाठलाग करून वैभव पुजारी यांच्या डोक्यावर, हातावर आणि पाठीवर तलवारीने वार केले. या हल्ल्यात वैभव पुजारी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेप्रकरणी मयूर आकाराम पुजारी, ओंकार बिरू पुजारी, शुभम बोरसे, राहुल कांबळे आणि बंडा शिंदे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन आरोपींना अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तात्काळ सूत्रे हलवली. २१ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास, कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ओंकार बिरू पुजारी (रा. तिळवणी) आणि राहुल श्रीकांत कांबळे (रा. इचलकरंजी) या दोन फरारी आरोपींना तावडे हॉटेल परिसरातून अटक करण्यात आली. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलीस कर्मचारी वैभव पाटील, शिवानंद मठपती, संतोष बरगे, प्रदीप पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, योगेश गोसावी, राजू कांबळे, सागर चौगले, महेश पाटील आणि अरविंद पाटील यांचा समावेश होता.
या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. शिवाजीनगर पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी साळवे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button