कागल नगरपरिषदेचे स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये ऐतिहासिक यश: देशात १२वा, राज्यात २रा क्रमांक!

कागल ( सलीम शेख ) : कागल शहराने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाच्या स्वच्छ भारत मिशन (नागरी) २.० अंतर्गत झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये अभूतपूर्व यश संपादन केले आहे. २०,००० ते ५०,००० लोकसंख्या गटात देशात १२वा आणि महाराष्ट्रातील १६५ शहरांमध्ये गौरवास्पद २रा क्रमांक पटकावून कागलने आपले नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
या सर्वेक्षणामध्ये विविध निकषांवर शहराचे व्यापक मूल्यांकन करण्यात आले. यात घराघरातून कचरा संकलन, ओल्या व सुक्या कचऱ्याचे वेगवेगळे संकलन, कचऱ्याचे प्रक्रियाजन्य व्यवस्थापन, सार्वजनिक व निवासी क्षेत्रातील स्वच्छता, बाजारपेठा व व्यावसायिक क्षेत्रातील स्वच्छता, जलस्रोतांची स्वच्छता व देखरेख, सार्वजनिक शौचालये व स्वच्छता सुविधांची उपलब्धता, तक्रारींचे निवारण, सुशोभिकरण, कोंडाळे-मुक्त रस्ते आणि उघड्यावर कचरा न टाकणे यासाठी केलेल्या उपायांचा समावेश होता.
या प्रभावी कामगिरीमुळे कागल शहराला ODF++ (हागणदारी मुक्त शहर) मानांकन मिळाले असून, ‘कचरा मुक्त शहर’ स्टार रेटिंगमध्ये सलग तिसऱ्यांदा ३-स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. मागील वर्षी राष्ट्रीय क्रमांक ११० वर असलेले कागल शहर यंदा थेट १२ व्या क्रमांकावर झेपावले आहे, तर राज्यात २७ व्या क्रमांकावरून थेट २ ऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
कागल नगरपरिषदेच्या या अभूतपूर्व यशामागे अनेक घटकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर हसन मुश्रीफ साहेब यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे ही वाटचाल शक्य झाली. मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या यंत्रणेने नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण कार्य केले. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे नोडल अधिकारी नितीन कांबळे, शहर समन्वय अधिकारी आशिष शिंगण, स्वच्छता मुकादम बादल कांबळे, आणि स्वच्छता मुकादम कौतिक कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशात कागल शहरातील सर्व शासकीय व अशासकीय संस्था, महिला बचत गट, सेवाभावी संस्था, वनमित्र पर्यावरण संस्था, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, व्यावसायिक बंधू-भगिनी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, महाविद्यालयीन विद्यार्थी, नगरपरिषद शिक्षक व मुख्याध्यापक, तसेच आरोग्य विभाग (सर्व कायम व कंत्राटी कर्मचारी), बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, दिवाबत्ती विभाग, करवसुली विभाग, आस्थापना विभाग, अग्निशमन विभाग तसेच इतर विभागाचेही सर्व अधिकारी/कर्मचारी, किर्लोस्कर ऑईल इंजिन आणि संपूर्ण अर्थ लाइव्हलीहुड फाउंडेशन इत्यादींचे मोलाचे सहकार्य व योगदान लाभले.
या सामूहिक प्रयत्नांमुळेच कागल शहराने स्वच्छतेच्या या महत्वाकांक्षी अभियानात देशात आणि राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.