देशात भारी आम्ही कोल्हापूरी’ शेक्षणिक विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी नेण्याचा निर्धार- शिक्षणाधिकारी डॉ मीना शेंडकर!

कागल: (सुभाष भोसले) ‘देशात भारी- आम्ही कोल्हापुरी’ या टॅगलाईन प्रमाणे कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक विभागात देशात अव्वलस्थानी नेण्याचा निर्धार प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ.मीना शेंडकर यांनी व्यक्त केला.
व्हन्नूर (ता.कागल) येथील श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय येथे झालेल्या कागल तालुका आढावा बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या.
डॉ. शेंडकर पुढे म्हणाल्या, कोल्हापूर जिल्हा गुणवत्ता विकासात (PGI) राज्यात प्रथम, तर परख सर्वेक्षणामध्ये देशात 26 वा आलेला आहे. या विभागात कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम क्रमांक आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शिष्यवृत्तीमध्ये आपला जिल्हा महाराष्ट्र राज्यात प्रथम आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. यासाठी मुख्याध्यापकांनी बदल स्वीकारण्याची मानसिकता ठेवावी. शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आपणास संधी मिळाली याचे सोने करावे. यावेळी विशाखा समिती, विद्यार्थी सुरक्षा, स्कुफ, PAT परीक्षा, तंबाखूमुक्त शाळा, निक्षय, निवडश्रेणी, नाविन्यपूर्ण उपक्रम, एक पेड माँ के नाम, संच मान्यता, आधार व्हॅलीडेशन, प्रधानमंत्री पोषण आहारबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी कागल तालुक्याचा शिष्यवृत्ती व विविध योजनांचा आढावा घेऊन तालुका आघाडीवर असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर प्रथम स्थानी आल्याबद्दल डॉ. मीना शेंडकर यांचा सत्कार करण्यात आला. ‘शाळा तिथे शेवगा’ या उपक्रमाचा कागल तालुक्याचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. सतीश पाटील यांनी सर्व रोपे शाळांना मोफत दिली. यावेळी उपशिक्षणाधिकारी आर.व्ही.कांबळे, विस्तार अधिकारी कदम, रामचंद्र गावडे यांची मनोगते झाली. केंद्रप्रमुख सुनिता किणेकर, संजय चिखलीकर, सुनील पाटील, जी.एस.पाटील, बाळासाहेब निंबाळकर, एस. के. पाटील व कागल तालुक्यातील 119 शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
स्वागत केंद्रप्रमुख एस.व्ही. पाटील यांनी केले. विवेक गवळी यांनी सूत्रसंचालन केले. तर मुख्याध्यापक व्ही.जी. पोवार यांनी आभार मानले.