कागलमधील पिलर उड्डाणपुलास मंजुरी: राजे समरजित घाटगे यांनी गडकरींचे मानले आभार!

कागल (सलीम शेख) : कागल शहरातील बहुप्रतिक्षित पिलर पद्धतीच्या उड्डाणपुलाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. याबद्दल राजे समरजित घाटगे यांनी नवी दिल्ली येथे गडकरींची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या उड्डाणपुलामुळे कागल शहरातील वाहतूक कोंडी दूर होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, तसेच शहर विकासालाही चालना मिळणार आहे. याआधी, राजे घाटगे यांनी गडकरींची भेट घेऊन कागलमध्ये भरावाऐवजी कराडच्या धर्तीवर पिलर पद्धतीचा पूल उभारण्याची आग्रही मागणी केली होती. त्यानंतर आर. के. पांडे यांच्या समितीने पाहणी करून नागरिकांच्या सूचना ऐकल्या, आणि अखेर या मागणीला यश मिळाले. यामुळे कागल शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार असून वाहतूक अधिक सुलभ होईल आणि शहराचा विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याच भेटीदरम्यान, पिलर पुलामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांच्या वाढीव नुकसान भरपाई, रुंदीकरणात सवलत आणि इतर मागण्यांबाबतही मंत्री गडकरी यांच्याशी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. गडकरी यांनी यावरही सकारात्मक भूमिका दर्शवून नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती राजे समरजित घाटगे यांनी दिली.