कागल येथील दुधगंगा नदीवरील पूल बनला मृत्यूचा सापळा: वाहनचालक त्रस्त!

कागल (सलीम शेख ) : कागल येथील दुधगंगा नदीवर असलेल्या पुलाच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे, तर मध्यभागी एक मोठा खड्डा पडल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे. काही अंतरावरच कोगनोळी टोल नाका असतानाही प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दररोज छोटे-मोठे अपघात घडत असून, वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एका बाजूला रस्त्याची दुरवस्था असतानाही वाहनचालकांना टोल भरावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे तातडीने या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे. या धोकादायक पुलामुळे नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.