कागलच्या गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त उत्साहात दिंडी सोहळा!

कागल (सलीम शेख ) : येथील नगर परिषदेच्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिरमध्ये आज आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या उत्साहात आणि आनंदात वारकरी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत सहभाग घेतला, ज्यामुळे शाळेचे वातावरण भक्तिमय झाले होते.
या दिंडीचे संचलन शाळेमार्फत विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरापर्यंत करण्यात आले. खर्डीकर चौक मार्गे निघालेली ही दिंडी मंदिरात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात बेभान होऊन अभंग सादर केले आणि विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
या दिंडी सोहळ्याचे उद्घाटन उदय पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले. शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांनी या भक्तिमय उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सर्वत्र या कार्यक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक होत आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पडला.