राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त कागलमध्ये भव्य रक्तदान शिबिर, १०० वर्षांनंतरही शाहू विचारांचा वारसा!

कागल (सलीम शेख ) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त (१५० वे वर्ष) सुरू असलेल्या पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर, कागल तालुका प्रशासनाने आज, ९ जुलै २०२५ रोजी बहुउद्देशीय हॉल, कागल येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले. शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देणाऱ्या या उपक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, डॉ. सरिता थोरात, डॉ. फारूक देसाई आणि पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात तहसील कार्यालय, नगरपरिषद, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, कृषी, आरोग्य व विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यासोबतच सामान्य नागरिकांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
या शिबिरात संकलित झालेले रक्त छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR), कोल्हापूर येथील रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे, अशी माहिती गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे आणि आरोग्य अधिकारी डॉ. देसाई यांनी दिली. हे रक्त गरजू रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, सर्व रक्तदात्यांची आवश्यक आरोग्य तपासणी मोफत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमात आरोग्य विभागातील डॉक्टर, सेवक-सेविका, तंत्रज्ञ आणि समुदाय आरोग्य अधिकारी आदींनी सक्रिय सहभाग घेऊन शिबिर यशस्वी केले. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला असून, शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आजही जपला जात असल्याचे यातून दिसून आले.