कागलमध्ये भरदिवसा घरफोडी; ५.७० लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास, पोलिसांसमोर आव्हान!

कागल (सलीम शेख): कागल शहरात भरदिवसा घरफोडी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
ही घरफोडीची घटना दिनांक १० जुलै रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. कागल येथील माळी गल्लीत राहणारे सचिन अशोक पाटील (मूळगाव बारवाड, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) यांच्या घरी हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पाटील आणि त्यांच्या पत्नी यळगुड, तालुका हातकणंगले येथे कामावर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला.
रात्री उशिराने कागल पोलिसांनी या घटनेची तक्रार दाखल करून घेतली आहे. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.