शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात ‘रास्ता रोको’ आंदोलन; शेतकरी एकवटले!

कोल्हापूर (सलीम शेख ) : १२ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाला न जुमानता प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या आंदोलनात आजी-माजी आमदार आणि खासदारांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते, त्यांनी या प्रकल्पाला आपला ठाम विरोध दर्शवला.
यावेळी बोलताना आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “आपली शेती वाचवण्यासाठी कृषी दिनादिवशीच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागते, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असून, हा प्रकल्प महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा, हीच जनभावना असून सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार राजूबाबा आवळे, ऋतुराज पाटील, संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सचिन चव्हाण, राजू लाटकर, आर.के.पोवार, तसेच संघर्ष समितीचे गिरीश फोंडे आणि प्रकाश पाटील यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते. त्यांनी एकजुटीने शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला.
या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, शेतकऱ्यांचा हा तीव्र विरोध सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.