महाराष्ट्र ग्रामीण

शक्तीपीठ महामार्गविरोधी आंदोलनाने पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक विस्कळीत; पोलिसांची दमछाक, शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न!

लक्ष्मी टेकडी (सलीम शेख) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाव शक्तीपीठ महामार्गाविरोधी चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग अडवल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी ३०० हून अधिक पोलिसांच्या बंदोबस्तात पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवली, ज्यामुळे वाहनधारकांना लांबच्या प्रवासाचा सामना करावा लागला.


पुण्याहून कागलकडे जाणारी वाहतूक तसेच कागलकडून पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे वळवण्यात आली होती. कागलकडून पुण्याकडे जाणारी वाहने लक्ष्मी टेकडीवरून पंचतारांकित एमआयडीसीमार्गे इचलकरंजी, हातकणंगले मार्गे सांगली आणि पेठवडगाव, वाठारमार्गे पुण्याकडे वळवण्यात आली. तर काही वाहने उजळाईवाडी येथून शाहूनाकामार्गे कसबा बावडा, शिये फाट्यावरून पुण्याकडे वळवण्यात आली होती. कागलच्या दिशेने जाणारी वाहने वाठार येथून पेठवडगाव, इचलकरंजीमार्गे पुढे कागलकडे वळवण्यात आली. या सर्व व्यवस्थेमुळे वाहनधारकांना बराच वेळ अधिक प्रवास करावा लागला.मुख्य मार्ग काही काळ मोकळाच पडला होता.


पंचगंगा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन सुरू असताना, दानोळी (तालुका करवीर) येथील एका शेतकऱ्याने थेट नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावरील पोलीस आणि अन्य शेतकऱ्यांनी तात्काळ त्याला अडवले. यावेळी शक्तीपीठ महामार्गामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने “आमच्या जमिनी गेल्या तर आमच्या वारसांनी यापुढे खायचे काय? आता आम्हाला आमचे कुळ वाढवायचे नाही, आम्हाला आत्महत्या करू द्या,” महायुती सरकारच्या नावाने टाहो फोडला. या घटनेमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. “गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका,” अशी तीव्र भावना शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.


दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे घालण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button