महाराष्ट्र ग्रामीण

गांजा आणि नशिल्या इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; ₹१.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) तीन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे ₹१ लाख ३२ हजार ६०२ किमतीचा गांजा आणि नशिल्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या विक्रीमुळे तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याची गंभीर बाब जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गांभीर्याने घेतली होती. त्यांनी अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनाचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी विशेष पथके तयार केली.
या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांना गोपनीय माहिती मिळाली की, झुम प्रकल्प, कसबा बावडा परिसरात दोन जण ॲक्सेस दुचाकीवरून गांजा आणि नशिल्या इंजेक्शनची विक्री करणार आहेत. त्यानुसार, पोलिसांनी ५ जुलै २०२५ रोजी सापळा रचून कारवाई केली.
यावेळी पोलिसांनी सोहील संभाजी मोहीते (वय २४, रा. कळंबा) आणि रोहन संजय चव्हाण (वय ३३, रा. कवडे गल्ली, कसबा बावडा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये मेफेन्टर्माइन सल्फेट आणि मिडाझोलम इंजेक्शन आय.पी. मेझोलम या कंपनीच्या एकूण ८३ नशिल्या इंजेक्शनच्या बाटल्यांसह इतर साहित्य, असा एकूण ₹१,३२,६०२ किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या चौकशीदरम्यान, आरोपी रोहन चव्हाण याने हा नशिल्या इंजेक्शनचा साठा आपला मित्र अजय श्रीकांत डुबल (वय ४४, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अजय डुबललाही तात्काळ ताब्यात घेतले.
गांजा आणि नशिल्या इंजेक्शनच्या बेकायदेशीर साठ्याबाबत कायदेशीर कारवाई करत शाहूपुरी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा कुठून आणला, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आणि अपर पोलीस अधीक्षक बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, तसेच पोलिस कर्मचारी गजानन गुरव, वैभव पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, शिवानंद मठपती, राजू कांबळे, प्रदीप पाटील, संतोष बरगे, महेंद्र कोरवी, लखन पाटील, विजय इंगळे, परशुराम गुजरे आणि संजय पडवळ यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button