कोल्हापूर जिल्ह्यात मानवी वस्तीत कोल्ह्याचे दर्शन, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोल्हापूर (सलीम शेख) : एकेकाळी दुर्मिळ मानले जाणारे जंगली प्राणी आता कोल्हापूर जिल्ह्यातील मानवी वस्तीत दिसणे ही काही आश्चर्यकारक बाब राहिलेली नाही. अलीकडच्या काळात प्रत्येक गावात एखादा जंगली प्राणी मानवी वस्तीत वारंवार दिसून येत आहे. अशीच एक घटना गारगोटी रोडवर घडली असून, एका कोल्ह्याचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गारगोटी रोडवरून ‘इन्फ्लुएंसर कोल्हापुरी बकासुर’ हे आपल्या गाडीतून जात असताना त्यांना अचानक एक कोल्हा प्राणी दिसला. प्रथमदर्शनी त्यांना तो कुत्रा असल्याचा भास झाला, परंतु बारकाईने पाहिल्यावर तो कोल्हा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. जंगली प्राणी मानवी वस्तीत येण्याचे वाढते प्रमाण पर्यावरणातील बदलांचे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासावरील अतिक्रमणाचे संकेत देत आहे. या घटनेमुळे वन्यजीवांच्या संरक्षणाची आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नागरिकांनी अशा प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.