नंदवाळच्या प्रति-पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त आमदार चंद्रदीप नरकेंच्या हस्ते महापूजा संपन्न!!

नंदवाळ (सलीम शेख ) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर करवीर तालुक्यातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील पांडुरंगाची पहाटेची महापूजा आमदार चंद्रदीप नरके यांच्या शुभहस्ते मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. याप्रसंगी लाखो भाविकांनी विठ्ठल चरणी लीन होऊन आरोग्य आणि सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
नंदवाळ हे गाव प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असून, दरवर्षी आषाढी एकादशीला येथे मोठ्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. आमदार चंद्रदीप नरके यांनी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत, राज्याच्या जनतेसाठी उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी लाभावी असे साकडे घातले.
या पूजेला आमदार यांची कन्या ऐश्वर्या नरके-पोळ, करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे, सरपंच अमर कुंभार, उपसरपंच तानाजी कांबळे, ग्रामसेवक प्रियांका पाटील, बबन पाटील, देवस्थान समितीचे सदस्य भीमराव पाटील, कृष्णात पाटील, पाठक सर, पोलीस पाटील विनायक उलपे यांच्यासह अनेक मान्यवर आणि असंख्य भाविक उपस्थित होते. पहाटेपासूनच विठ्ठल मंदिरात भाविकांची रीघ लागली होती आणि ‘विठ्ठल विठ्ठल’ गजराने परिसर दुमदुमून गेला होता.