कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस थांबला, शेतकऱ्यांसाठी दिलासा; वाहनधारकांना धुळीचा त्रास!

कोल्हापूर (सलीम शेख ) : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे रखडलेली खुरपणी आणि बांधणीची कामे आता वेगाने मार्गी लागत आहेत. शेतीच्या कामांसाठी मिळालेल्या या मोकळ्या वेळेमुळे बळीराजा सुखावला आहे.
मात्र, पावसाने उघडीप दिल्याने वाहनधारकांना एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यांवरून वाहने धावताना मातीचे कण हवेत मिसळून मोठ्या प्रमाणावर धुळीकरण होत आहे. यामुळे वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. समोरचे रस्ते स्पष्ट दिसत नसल्याने अपघातांचा धोकाही वाढला आहे.
या धुळीमुळे वाहनचालकांना डोळे आणि तोंडावाटे धुळीचे कण शरीरात जाण्याचा त्रास होत आहे. यामुळे डोळ्यांची आग होणे, घसा खवखवणे अशा समस्या उद्भवत आहेत. या परिस्थितीत अनेक वाहनधारकांनी स्वतःच्या बचावासाठी रुमाल, मास्क आणि गॉगलचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी, रस्त्यांवरील धुळीचा प्रश्न कायम आहे.
प्रशासनाने या धुळीच्या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्यांवर पाणी मारणे किंवा इतर उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.